मंगळुरु - कर्नाटकात मासेमारीला गेलेल्या मच्छिमारांची बोट समुद्रातील ब्रेकवॉटरला( लाटांचा मारा रोखण्यासाठी समुद्रावरील अडथळा) ला धडकल्याने अपघात झाला. या अपघातानंतर ४ मच्छिमार बेपत्ता झाले आहेत. ही घटना उडपी जिल्ह्यातील कोडेरी मासेमारी जेट्टीजवळ घडली.
बोटीमध्ये ११ मच्छिमार होते. त्यातील चार जण बेपत्ता झाले असून इतर ७ जण किनाऱ्यावर सुखरूप पोहचले. वाऱ्यामुळे बोटी अनियंत्रित झाली, व ब्रेकवॉटरला धडकली. शेकरा, नागा, लक्ष्मण आणि मंजुनाथन असे बेपत्ता मच्छिमारांची नावे असल्याचे तटरक्षक दलाच्या पोलिसांनी सांगितले.
सर्व मच्छिमार उप्पेनंडा येथून मासेमारी करण्यास समुद्रात गेले होते. अपघातातून वाचलेल्या ५ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दोघांना वैद्यकीय मदतीची गरज पडली नाही, असे पोलिसांनी सांगितले. बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी शोधकार्य राबविण्यात आले आहे.
अशा घटना या आधीही घडल्या आहेत. अपघात रोखण्यासाठी मुद्रातील ब्रेकवॉटरची लांबी आणखी असायला हवी, असे मच्छिमारांच्या स्थानिक नेत्याने सांगितले. बेंदुर येथील आमदार बी. एम. सुकुमार यांनीही घटनास्थळाला भेट दिली. मागील काही दिवसांत चौथ्यांदा असा अपघात घडल्याचे सुकुमार यांनी सांगितले. खराब हवामानामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला होता, तरीही मच्छिमार समुद्रात गेले होते.