नवी दिल्ली- काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर पक्षातील 23 नेत्यांनी पत्राद्वारे काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा आणि पक्षांतर्गत कामकाजात सुधारणा करण्याची मागणी केली. यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि पॉंडिचेरी या राज्यांचे मुख्यमंत्री सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबाजूने उभे राहिले आहेत. त्यांनी पत्र लिहण्याऱ्या नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
पत्रामुळे देशातील लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. फेसबुक प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी म्हटले. आपला वारसा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण लढत आहोत. सोनिया गांधी नेहमीच आव्हानांना सामोऱ्या गेल्या आहेत. जर सोनिया गांधी राजीनामा देणार असतील राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी देखील राहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी तयार व्हावे, असे म्हटले.
दिल्ली काँग्रेसने राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे असा ठराव मंजूर केला. काँग्रेस कार्यकारिणी सदस्य खासदार राजीव सातव, अजय माकन आणि पी.एल.पुनिया यांनी देखील पत्र लिहणाऱ्या नेत्यांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी गांधी परिवाराने पक्षाचे नेतृत्व करावे, असे म्हटले आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीच्या अंतिम निर्णय होईपर्यंत वाट पाहावी, असे सांगितले आहे.