जयपूर - देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि पोलीस, सुरक्षा दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जयपूरमध्ये 4 पोलीस कमांडोंना रविवारी रात्री उशिरा कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य पोलिसांनाही क्वारंटाईन केले असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
जयपूर पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत एकूण 13 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान 9 पोलीस कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा ड्युटीवर आले आहेत. तसेच त्यांनी प्लाझ्मा थेरपीसाठी त्यांचे प्लाझ्मा देखील दान केले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये कर्तव्यावर असलेल्या कोरोनाची लागण होत आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांच्या गेल्या 15 दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे. त्यानंतर आता सीएपीएफमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1180 पर्यंत पोहोचली आहे. बीएसएफमध्ये आतापर्यंत 400 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.