बेळगाव- जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. ही घटना गोकाक तालुक्यातील अंजनकट्टी गावात घडली. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
भागव जक्कनवार(6) थय्यमा जक्कनवार (5) मल्लप्पा जक्कनवार(4) आणि राजश्री जक्कनवार अशी मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. करिअप्पा जक्कनवार आणि त्याच्या पत्नीने पाण्यात पडलेला फोन शोधण्यासाठी उडी मारल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्याचे अनुकरण केल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
करिअप्पा जक्कनवार आणि त्याचे कुटुंब शेतात वास्तव्यास होते. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना इतर ठिकाणी वास्तव्यासाठी जागा मिळाली नाही. करिअप्पा जक्कनवार आणि त्याच्या पत्नीच्या निष्काळजीपणामुळे चार मुलांचा मृत्यू झाला. शेतातील विहिरीतून निघणारे पाणी अडवण्यासाठी मोठा खड्डा काढण्यात आला होता त्यामध्ये मुलांचा बुडून मृत्यू झाला.
गोकाक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 11 वर्षीय मुलीचा 6 फुट खोल खड्डयात बुडून मृत्यू झाला होता.