वर्धा - विकासाच्या नावावर आज मोठ्या प्रमाणात निसर्गाचा विनाश सुरू आहे. यावर वेळीच ठोस पाऊल उचलेले गेले नाही तर, येत्या ६०-७० वर्षात ही पृथ्वी कोणत्याही सजीवांसाठी जागण्यायोग्य राहणार नाही. आत्ताचे प्रदूषण सजीवांकरता किती घातक आहे याचा मोजमाप करायची गरज नाही. पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठीची जागरुकता आमच्यात निर्माण व्हायची गरज असल्याचे मत आणि चिंता तिबेटचे पूर्व पंतप्रधान समदोंग रिनपोछे यांनी व्यक्त केली. यावर उपाययोजना म्हणून बापू आणि विनोबांनी ग्रामस्वराज्यचा मार्ग सांगितल्याचे सुद्धा ते म्हणाले. ते पवनार येथे आयोजित मैत्री मिलन सोहळ्यात बोलत होते. अंतिम सत्रात महात्मा गांधी आणि विनोबांचा संदेश अधिक महत्त्वाचा असून ग्रामस्वराज स्वीकारून आपण आपल्या आयुष्यात मोठा बदल करू शकतो असेही ते म्हणाले.
आपल्याला विकास पाहिजे आणि विकास हा विनाशासोबत होत आहे. कारण विकासाची परिभाषा बदलली आहे. जितका मोठा विकास तितकाच मोठा विनाश होणार असल्याचे म्हणत त्यांनी यावर चिंता व्यक्त केली. विज्ञानाने आज प्रत्येक क्षेत्रात मोठे पाऊल उचलले आहे. त्याबरोबरच यात मोठ्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. सकारात्मक सफलता आणि आधुनिक चिकित्सा विद्या माणसाला वरदान ठरत आहे. मात्र, आजच्या युगात सर्वात मोठी समस्या ही वैश्वीकरणाची झाली आहे. या समस्येचे मूळ शोधून त्यावर उपाय म्हणून ग्रामस्वराज्यचा नारा महात्मा गांधी आणि विनोबांनी दिला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २२ जानेवारीला
वाढत्या औद्योगीकरणाबरोबर मोठ्या प्रमाणात लोभही वाढला आहे. गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा उपभोग घेणे म्हणजेच लोभ असल्याचे विनोबांनी सांगितले आहे. मात्र, आजकाल वस्तूंचा उपयोग करण्याऐवजी उपभोग करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे. यातून एखाद्या वस्तूंचे अधिक उत्पादन करणे, नफा मिळवण्यासाठी ती विकणे, या सर्वामधून स्वार्थ वाढत चालला आहे. हे धोकादायक ठरणारे आहे असेही ते म्हणाले.
हेही वाचा - दोन भारतीयांना पाकिस्तानमध्ये अटक, परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपाची प्रतिक्षा
आज जागतिकीकरणाचा नारा दिला जात आहे. यामधून स्वार्थ पाहत युद्ध पेटवून दिले जात आहे. देशातील शांततेसाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. युद्ध नियंत्रणात ठेवण्याची ताकद आज कोणत्याच नेतृत्वात नाही. युद्ध थांबवण्यात कोणालाही रस नाही, शांती आणणे हा कोणाचाच उद्देश नाही. या सगळ्या काळात स्वाधिनतेचा संदेश देऊ शकत नाही. यासाठीचा पर्याय म्हणजे हिंदस्वराज असून नंतर ग्रामस्वराज्यचा नारा देणे गरजेचे झाले आहे. या पृथ्वीत सर्वांच्या गरजा भागवण्याची ताकद आहे. वस्तूंचा योग्य उपयोग करण्याची गरज आहे. ती उपभोग करण्याची नाही, असा संदेश तिबेटचे माजी पंतप्रधान समदोंग रिंनपोछे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू