नवी दिल्ली - भारताने आज 'ए-सॅट' या उपग्रहविरोधी मिसाइलच्या सहाय्याने उपग्रह पाडला. याचे नाव 'मिशन शक्ती' असे ठेवण्यात आले होते. 'मिशन शक्ती'च्या यशानंतर मोदींनी याची घोषणा केली. यामुळे अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात भारताने स्वतःचे नाव कोरले असून, देशासाठी हा अभिमानाचा दिवस आहे, असे मोदींनी म्हटले. यानंतर विरोधक पक्षांनी मोदींवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. याविषयी माजी डीआरडीओ प्रमुख डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. यामुळे मोदींचे विरोधक तोंडावर पडले आहेत.
'आम्ही या प्रकल्पाचे सर्व प्रकारे सादरीकरण २०१२मध्ये तत्कालीन संपुआ (यूपीए) सरकारसमोर केले होते. त्यांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले होते. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसोबत चर्चाही करण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने यूपीए सरकारने आम्हाला 'मिशन शक्ती' पूर्ण करण्याची परवानगी दिली नाही. भाजप सरकारच्या काळात मात्र डॉ. सतीश रेड्डी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा प्रस्ताव पुन्हा मांडला. त्यांच्यामध्ये (मोदी) हा निर्णय घेण्याचे धैर्य होते. त्यामुळे भाजप सरकारने आवश्यक इच्छाशक्ती दाखवल्याने आम्ही हे 'मिशन' पूर्ण करू शकलो. यूपीए सरकारच्या काळातच ही परवानगी मिळाली असती, तर २०१४-१५ मध्येच हे मिशन पूर्ण झाले असते,' असे डॉ. सारस्वत यांनी म्हटले आहे. यामुळे आमच्या काळातच या मिशनचा पाया घातला गेला, असे म्हणणाऱ्या काँग्रेसच्या दाव्यातली हवा निघाली आहे.
काही वेळापूर्वीच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी अंतरिक्षात ३०० किमी दूर लो-अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडले. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्याने उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज याविषयी मोठी घोषणा केली. भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवल्याचे मोदींनी म्हटले आहे. मात्र, यानंतर या घटनेचा मोठा गवगवा केल्यावरून राहुल गांधींनी मोदींना रंगभूमी दिनाच्या उपहासात्मक शुभेच्छा दिल्या. तसेच, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर हल्ला चढवला.
काँग्रेसने २०१२ मध्येच या 'मिशन'चा पाया घातला होता. या 'मिशन'ची सुरुवात काँग्रेसच्याच काळात झाली होती. तरीही मोदींनी हे आपले आणि भाजप सरकारचे यश असल्याचे सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. असे विरोधक काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. 'भारतीय अंतराळ कार्यक्रमातील आजच्या टप्प्यासाठीचा पाया २०१२ मध्ये काँग्रेसच्या काळातच रचला गेला होता. तसेच, भारताला अंतराळ कार्यक्रमात पुढे नेण्याचे ध्येय पंडित नेहरूंनी डोळ्यांसमोर ठेवले होते. याचीच फळे आज चाखायला मिळत आहेत. भारतासाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण आहे,' असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे. काँग्रेसने हे श्रेय भाजप सरकारचे नसून काँग्रेसचे असल्याचा दावा केला होता. मात्र, डॉ. सारस्वत यांनी दिलेल्या माहितीमुळे हा दावा खोटा ठरत आहे.