तिरुवनंतपूरम - केरळमधील वन अधिकाऱ्यांनी साइलेंट व्हॅली नॅशनल पार्क जवळ गंभीर जखमी असलेल्या वन्य हत्तीचा जीव वाचवला आहे. वनविभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात हत्तीवर उपचार केले जात असून हत्ती आता धोक्याच्या बाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हत्तीच्या पोटाच्या खालच्या भागाला गंभीर जखम झाली असून त्याच्या तोंडात सूज आली आहे. त्यामुळे सध्या हत्ती काही खाण्यास किंवा पाणी पिण्यास सक्षम नाही. हत्तीने औषधांना प्रतिसाद देणे सुरू केले असून तो धोक्याच्या बाहेर आहे. तसेच जखम बरी झाल्यावर त्याला जंगलात सोडले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क येथे फटाक्यांनी भरलेले अननस खायचा प्रयत्न केला असता स्फोट होऊन हत्तीण गंभीर जखमी झाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला. देशपातळीवर या प्रकरणाची चर्चा झाल्याने पोलीस आणि वनविभाग वेगाने या प्रकरणी तपास करत आहे. जंगली रानडुकरांना मारण्यासाठी कोणीतरी अननसात फटाके ठेवल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली आहे.