अयोध्या - भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी अयोध्येच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांना अर्थव्यवस्था आणि आर्थिक मंदीविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही तेव्हा, त्या काय सुधारणा करणार, असे म्हटले आहे. यामुळे मोदी सरकारला स्वामींकडून घरचा आहेर मिळाला आहे.
'सध्या देश आर्थिक मंदीतून जात आहे. मात्र, ही परिस्थिती ठीक करता येऊ शकते. पण हे कसे करायचे, हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना माहितीच नाही. अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे जे ज्ञान असले पाहिजे, ते त्यांच्याजवळ नाही,' असे स्वामी म्हणाले.
'सध्या देशात मंदीची लहर आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास आणखी गंभीर स्थिती ओढवू शकते. मला वाटते, अर्थमंत्र्यांना आवश्यक आर्थिक ज्ञान नसल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. आता त्यांना ज्ञानच नसेल, तर त्या काय सुधारणा करणार,' असा सवाल स्वामींनी केला.
हेही वाचा - 'प्रियांका गांधींना का पुढे आणत नाहीत सोनिया,' हा एक मोठा पेच - नटवर सिंह
दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची स्थिती गंभीर झाल्यामुळे त्यांनी यंदाच्या सरकारमध्ये आपला समावेश न करण्याची विनंती केली होती. यामुळे सीतारामन यांच्या अर्थमंत्री करण्यात आले. स्वामींच्या या वक्तव्यामुळे मोदी सरकारवर पक्षाच्या खासदाराकडूनच ताशेरे ओढण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्रालयात असताना आपली छाप पाडल्यानंतर आता अर्थमंत्रालयातही सीताराम यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात देश वेगाने मंदीच्या दिशेने चालला आहे. स्वामींच्या या वक्तव्याने मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे आणि विरोधकांना एक संधी दिली आहे.
हेही वाचा - तिहार तुरुंगात चिदंबरम यांना कंपनी कोण देणार? स्वामी म्हणाले, सोनिया, थरूर !