पणजी (गोवा)- आठवडा भरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बार्देश, पेडणे आणि डिचोली या तालुक्यांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये कोणत्या स्वरुपाचे आणि किती नुकसान झाले याचा आढावा घेतला जात आहे. नुकसान मोठे आहे, परंतु आढावा घेतल्यानंतर नेमका आकडा समजणार असल्याची माहिती, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेबाहेर दिली.
डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात किती नुकसान झाले हे आता समजले नसले तरी नुकसान मोठे आहे. उत्तर गोव्यातील बार्देश, पेडणे आणि डिचोली या तीन तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. एका गावात घर कोसळले. मात्र आपात्कालीन यंत्रणा सज्ज असल्याने जीवितहानी टळली. सत्तरी तालुक्यातील युवकाचा बुडून झालेला मृत्यू हा त्याच्या स्वतः क्रृत्याने झालेला आहे. अशा परिस्थितीत आपदग्रस्तांना मदतीची गरज असल्यामुळे राज्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाखांची मदत केली आहे. अशा प्रकारची मदत राज्यतील उद्योजकांनी करावी.
अनेक ठिकाणी वीज आणि पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यावर काय उपाय योजना करणार असे विचारले असता, मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पुढील दोन दिवसात सर्वकाही पुर्वपदावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने पूर परिस्थिती आटोक्यात येत आहे. तिलारी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे शापोरा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. तर अणजुणे धरणातून नियंत्रित स्वरूपात पाणी सोडले जात आहे.
शनिवारपासून मुख्यमंत्री रशिया दौऱ्यावर
डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची जवाबदारी घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर जात आहेत. ते शनिवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेत्रुत्वाखालील रशियाच्या अभ्यास दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याविषयी बोलताना सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सहा मुख्यमंत्र्यांची या दौऱ्यासाठी निवड केली आहे. ज्यामध्ये उद्योजक सहभागी असून 150 जणांचे शिष्टमंडळ शनिवारी रशियाच्या अभ्यास दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात खाण, शेती, पर्यटन आदी उद्योगाचा अभ्यास करण्यात येणार आहे. दि. 12 आणि 13 रोजी ही पाहणी केली जाणार आहे. दरम्यान राज्यात येणाऱ्या रशियन पर्यटकांची संख्या कमी होत आहे. याची कारणे अथवा या पर्यटकांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत याचा आढावा घेतला जाईल.
दरम्यान, मागील आठवडाभर सुरु असलेला टँक्सी व्यावसायिकांचा संप संपुष्टात आला आहे. ज्यांना 'गोवा माईल्स' ही अॅपबेस्ड सेवा स्वीकारावी वाटते ते स्वीकारू शकतात. ज्यांना नको ते मीटर वापरू शकतात. सरकार याकरिता कोणालाही सक्ती करणार नाही.