पाटणा - बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर असून कोसी नदी तुडूंब भरुन वाहत आहे. पाण्याच्या पातळीत रोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता कोसी बंधाऱ्यातून १ लाख ४४ हजार २० क्यूसेक तर बराह क्षेत्रातून 96 हजार 800 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे या नजीकच्या क्षेत्रात पुराचे संकट वाढत असून यात १३ जिल्हे प्रभावित झाले आहेत.
प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
बिहार राज्यातील मोठा भाग निसर्गाच्या कोपाला बळी पडला आहे. यात आतापर्यंत १२७ लोकांनी आपला जीव गमावला असून ८२ लाख लोक प्रभावित झाले आहेत. पुरामुळे उत्तर बिहार मागील पंधरवाड्यापासून बेहाल आहे. रस्ते पाण्यात बुडाले आहेत, शेत जलमग्न झाले आहेत, घरांमध्ये पाणी शिरले आहे, बाजार बंद पडले आहेत, पूरग्रस्त लोकांनी एकतर उंच ठिकाणी आसरा शोधला आहे किंवा लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली वाहत आहेत.
नद्यांचे तुटलेले तटबंध वाढवत आहेत चिंता
बिहारमधील १३ जिल्हे शिवहर, सीतामढी, मुजफ्फरपुर, पूर्वी चंपारण, मधुबनी, दरभंगा, सहरसा, सुपौल, किशनगंज, अररिया, पूर्णिया, कटिहार आणि पश्चिम चंपारण हे पूराचा तडाखा झेलत आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून दरभंगा जिल्ह्यातील १४ तालुके अधिक प्रभावित झाले आहेत. या भागात अनेक घरे पाण्यात बुडालेली असून पुरग्रस्तांची उपासमार सुरू आहे. तर यादरम्यान टिक- टॉक वर व्हिडिओ बनवण्याचा नादात एका युवकाचा मृत्यू झाला आहे.
१२७ लोकांची मृत्यु ८२ लाख ८३ हजार लोक प्रभावित ; बचावकार्य सुरू
या दरम्यान मुख्यमंत्री परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या पूरात आतापर्यंत १२७ लोकांचा मृत्यू झाला असून ८२ लाख ८३ हजार लोक प्रभावित झाले आहेत. रस्ते दुरुस्त केले जात असून बचावकार्य सुरु आहे.
पुरानंतरचे उद्धवस्त पुरावे
पूराचे हे रौद्र रुप बिहार वासियांसाठी नविन नाही. दरवर्षी बिहारमधे अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळते. यात शैकडो लोकांचा मृत्यू होतो. हजारो लोकांना मदत केंद्रात हलवण्यात येते. ग्रामीण भागाचा संपर्क तुटतो. नद्या शांत झाल्या की परत जनजीवन पूर्ववत व्हायला लागते. अनेक समित्यांची स्थापना होते मात्र उपाययोजना काही होत नाहीत. थेट पुढचा पूर येईपर्यंत.