तिरुवनंतपुरम - केरळमध्ये मुसळधार पावसामुळे गुरुवारी पाच व्यक्तींचा मृत्यू झाला. पुराचा धोका लक्षात घेता 2 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसासोबतच जोरदार वारे सुटल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसाचा फटका राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
मलप्पुरममधील निलांबूर येथील चालियार नदीला थोड्या काळासाठी पूर आला आणि ओसरला. येथील लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करावे,असे प्रशासनाने सांगितले. मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोझिकोड, वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यांतील पूर्व भागातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले होते.
एरणाकुलममधील नेरियामंगलम खेड्यातील हत्तीचा मृतदेह अतिवृष्टीने पेरियार नदीत वाहून गेला, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्रिशूरमध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली.चालकुडी-इरिंजालकुडा प्रदेशात मुसळधार पावसाने रबराची झाडे आणि केळीचे शेत नष्ट झाले आणि इलेक्ट्रिक पोलही उखडले गेले आहेत. काही दुकाने आणि घरांवर झाडे पडली आणि त्यांचे नुकसान झाले.
केरळमध्ये तिसर्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच राहिला होता. भारतीय हवामान खात्याने वायनाड आणि इडुक्की या डोंगराळ जिल्ह्यांसाठी गुरुवारी आणि मलप्पुरम जिल्ह्यासाठी शुक्रवारसाठी 'रेड अलर्ट' बजावला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी 5 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 6 जण जखमी झाले असून 12 घरे पूर्णपणे कोसळली आहेत. 735 घरांना पावसाचा थोड्या प्रमाणात फटका बसला.
वायनाड जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला यामध्ये एक जण पाण्यात बुडून तर एक जण झाड अंगावर पडल्यामुळे दगावला आहे. तिरुअनंतपुरम आणि कासारगोड जिल्ह्यात झाड अंगावर पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर पलक्कड जिल्ह्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. गुरुवारी 1854 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 20 निवारागृह उभारण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे जून महिन्यापासून ऑगस्टपर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील विविध निवारागृहामध्ये 2334 लोकांना ठेवण्यात आले आहे.
इडुक्की जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली. मुन्नार मारा यूर रस्ता यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने इडुक्की कट्टापन्ना राष्ट्रीय महामार्ग देखील बंद ठेवला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरातील उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. परिणामी केरळमध्ये 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होईल असा इशारा दिला आहे. 7 ऑगस्ट रोजी मलप्पुरम जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर राज्यातील इतर नऊ जिल्ह्यांसाठी ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांचा समावेश आहे.
मलप्पुरम जिल्हा प्रशासनाने 9 निवारा गृह उभारली आहेत त्यातील 7 निवारागृहे निलांबूर मध्ये उभारली आहेत. या निवारागृहामध्ये 410 लोक असून कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे कंटेंनमेंट झोन मधील व्यक्तींना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
वायनाड जिल्हा प्रशासनाने 12 निवारागृह उभारली आहेत यामध्ये 500 60 लोकांची व्यवस्था व्यवस्था करण्यात आली आहे.अतिवृष्टी आणि जोरदार वारा सुटल्याने कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.राज्य सरकारने २४ तास सुरु असणारे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. भूस्खलनाची शक्यता असलेल्या इडुक्की, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम आणि पलक्कड जिल्ह्यात खबरदारी घेतली जाईल, असे प्रशासनाने सांगितले.