ननवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या राजघाटपासून विद्यापीठापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू होता. यावेळी एका तरुणाने गोळीबार केला. तो स्वतःला रामभक्त म्हणतो. दिल्लीच्या जेवर परिसरातील तो रहिवासी आहे. तो बारावीचा विद्यार्थी असून त्याच्या या कृत्याने कुटुंबातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.
या मोर्चाच्या दरम्यान तरुणाने समोर येत, विद्यार्थ्यांच्या दिशेने हातातील पिस्तूल दाखवले. पिस्तुल दाखवत त्यांने जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम' घोषणा दिल्याची माहिती आहे. यावेळी त्याने काही गोळ्याही झाडल्या, ज्यात एक शाबाद फारूक नावाचा विद्यार्थी जखमी झाला. पोलिसांनी तरुणाला नंतर ताब्यात घेतले.
तरुणाची चौकशी सुरू असून, जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. दिल्लीच्या राजघाट ते जामिया विद्यापीठापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी जामियाच्या विद्यार्थ्यांनी काल (बुधवार) मागितली होती. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आज विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता.
हेही वाचा : निर्भया प्रकरण : एक फेब्रुवारीला होणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, आरोपींच्या वकीलाची मागणी..