जयपूर : राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यात असणाऱ्या चौमूं तालुक्यात मंगळवारी रात्री भीषण वणवा पहायला मिळाला. रात्री नऊच्या सुमारास सामोद डोंगरावर आग लागून सुमारे एक किलोमीटर परिसरात हा वणवा पसरला होता. यावेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे हा वणवा वेगाने पसरत होता.
स्थानिकांनी आणि अग्निशामक दलाने विझवली आग..
डोंगरावर जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे जाऊ शकत नव्हत्या. मात्र, तरीही स्थानिकांच्या मदतीने अग्नीशामक दलाचे कर्मचारी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. शेजारील नांगल भरडा गावातील युवकांच्या मदतीने सुमारे दोन तासांमध्ये ही आग आटोक्यात आणण्यात आली.
बीटर पद्धतीचा केला उपयोग..
अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचू शकत नसल्यामुळे आग विझवण्यासाठी बीटर पद्धतीचा वापर करण्यात आला. यामध्ये ओली लाकडे आणि भिजवलेल्या चादरी किंवा पोत्यांचा वापर करत आग विझवण्यात येते. डोंगरावर पाण्याची व्यवस्थाही नसल्याने आग विझवताना बऱ्याच अडचणी येत होत्या.
दरम्यान, या आगीमुळे एक किलोमीटर परिसरातील झाडे-झुडपे जळून खाक झाली आहेत. तसेच, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
हेही वाचा : आजपासून राजस्थानमधील रुग्णवाहिका सेवा राहणार बंद; जाणून घ्या कारण..