नवी दिल्ली - पश्चिम दिल्लीतील शालीमार बागेतील एका घराला शनिवारी सायंकाळी आग लागली. पाहता-पाहता आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत ३ महिलांचा मृत्यू झाला. तर, आणखी 4 जण जखमी झाले.
शनिवारी सायंकाळी 6:10 वाजता शालीमार बागेतील पोलीस ठाणे प्रमुखांना पेट्रोलिंगदरम्यान शालीमार बागेतील BQ ब्लॉकमधील घराला आग लागल्याची माहिती मोबाइलद्वारे मिळाली. त्यांनी तातडीने सूत्रे हलवत बचावकार्याला सुरुवात केली. पोलीस आणि अग्निशामक दलाने सुरुवातीला दोन महिलांना आणि नंतर आणखी पाच लोकांना बाहेर काढले. या सर्वांना जवळच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू
या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. इतर चौघांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये कांता (वय 75), किरण शर्मा (वय 65) आणि सोमवती (वय 42) यांचा समावेश आहे.
बाकी चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये लाजवंती (वय 68), इन्ना (वय 28), अक्षित (वय 16) आणि वंशिका (वय 14), यांचा समावेश आहे.
आग विझवण्यात यश
आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. मात्र, अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
छताचा दरवाजा उघडा असता तर वाचले असते जीव...
अग्निशामक दलाच्या कर्मचारांनी छताचा दरवाजा तोडून आगीत अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. मात्र, ज्यावेळी आग लागली तेव्हा याच दरवाज्याकडे सर्व महिला पळाल्या होत्या. मात्र, हा दरवाजा बाहेरून बंद असल्यामुळे त्यांना तो उघडून बाहेर पडणे शक्य झाले नाही, असे सांगण्यात येत आहे.