जयपूर - कोरोना विषाणूशी लढा देत असताना एकजुटतेचे दर्शन व्हावे या उद्देशातून पंतप्रधान मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला देशभरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. काहींनी घरात दिवे, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईलमधील टॉर्च सुरू करून कोरोनाविरुद्ध एकतेचे दर्शन घडवले. तर, दुसरीकडे काही अतिउत्साही लोकांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे एका गरीब कुटुंबाला त्याच्या झोपडीला मुकावे लागले.
राजस्थानच्या जयपूरमध्येही अनेक ठिकाणी रात्री ९ वाजता नागरिकांनी दिवे लावून समर्थन केले. तर, काही ठिकाणी लोकांनी फटाके, झाड, रॉकेट लावण्यासारखा प्रकार करून एकप्रकारे दिवाळीच साजरी केली. तर, आणखी काही अतिउत्साही लोकांनी भावनेच्या भरात फटाके आणि आकाशात दिव्यांचे कापडी कंदीलदेखील सोडले. मात्र, या प्रकाराने वैशालीनगर येथील एका झोपडीला आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. तर, झोपडीच्या बाजूलाच असलेले एक घरदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे घर तर वाचले मात्र, एका गरिबाची झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली.
सध्या देशावर कोरोनाचे सावट असून लॉक डाऊनची परिस्थीती आहे. यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात राहून स्वत:ला जपतोय. मात्र, वैशालीनगर येथे जळालेल्या त्या झोपडीतील गरिब परिवाराने कुठे जावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.