अमरावती - आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये धावत्या कारला अचानक आग लागल्याने ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेतून एक जण बचावला आहे. जखमी अवस्थेत त्याला पलामानेरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारमधील सर्वजण बंगळुरुवरुन चित्तूर जिल्ह्यातील पलमानेरू येथे जात होते. दरम्यान धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरुन खाली फेकली गेली. त्यामुळे गाडीमधील प्रवाशांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.
कार पेटल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. त्यानंतर आग विझवण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.