पाटणा - राजकीय रणनितीतज्ज्ञ आणि जनता दल(यू) पक्षाचे माजी नेते प्रशांत किशोर यांच्या विरोधात संकल्पना चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'बिहार की बात' हे अभियान प्रशांत किशोर यांनी नुकतेच सुरू केले आहे. या अभियानासंबधीची संकल्पना चोरल्याचा आरोप त्यांच्यावर एका तरुणाने केला आहे.
मोतिहारी जिल्ह्यातील शाश्वत गौतम नावाच्या युवकाने हा या प्रकरणी पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गौतम याने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, बिहार की बात या अभियानावर मी काम करत होतो. थोड्याच दिवसात हे अभियान सुरू करणार होतो. मात्र, त्याआधीच या संकल्पनेची चोरी प्रशांत किशोर यांनी केली. किशोर यांच्यासह ओसामा नावाच्या युवकावरही गौतम शाश्वतने गुन्हा दाखल केला आहे. ओसामा या तरुणाने प्रशांत किशोर यांना सर्व कार्यक्रमाचा मजकूर पुरवला, असा आरोप गौतमने केला आहे.
प्रशांत किशोर यांनी कॉपी केली ?
हा कार्यक्रम सुरू करण्याआधीच प्रशांत किशोर यांनी संकल्पना चोरली. या प्रकरणी पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गौतमने पोलिसांना पुरावेही दिले आहेत. मजकूर चोरी होण्याच्या शक्यतेने जानेवारी महिन्यातच ही माहीत संकेतस्थळावर नोंदवल्याचा दावा गौतमने केला आहे. मात्र, तरीही प्रशांत किशोर यांनी माहिती चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.