अजमेर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची बाजी लावून लढत आहेत. डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलीस या लढाईत अग्रेसर आहेत. देशातील जनतेला घरीच थांबण्याचं आवाहन केले जात आहे. या परिस्थितीमध्ये राजस्थानातील एक परिचारिका आपल्या घरापासून 80 किलोमीटर दूर अंतरावर सेवा बजावत आहे, तिचे नाव आहे यशवंती गहरवार.
14 एप्रिला 21 दिवसांचा लॉकडाऊन संपत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचे जाहीर केले आहे. 21 दिवस काम रुग्णालयात केल्यनंतर यशवंती गहरवार तिच्या 2 वर्षाच्या मुलाला भेटण्यासाठी एका दिवसाची सुट्टी काढून अजमेरला आली होती. 2 वर्षांचा मुलगा युवान याला आज्जीकडे ठेवून ती कामावर हजर होण्यासाठी रवाना झाली.
अजमेर पासून 80 किलोमीटर अंतरावर रास या गावात यशवंती गहरवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनामुळे देश संकटात असताना कामावर हजर राहून लोकांचे जीव वाचवणे माझे पहिले कर्तव्य आहे, असे यशवंती गहरवार म्हणाल्या.
यशवंती गहरवार 3 महिन्यांपूर्वी रासमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत झाल्या आहेत. मुलगा युवानची आठवण येते तेव्हा त्याच्याशी व्हिडीओ कॉलिंग आणि फोनवर बोलते, असे त्यांनी सांगितले. यशवंती गहरवार आणि त्यांच्यासारख्या असंख्य कोरोना वॉरिअर्सना ईटिव्ही भारतचा सलाम...!