पाटणा - कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांचे भातपीक काढून तयार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व खरेदी-विक्री केंद्र बंद आहेत. त्यामुळे धान्य विक्रीचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
बिहार सरकारने यंदा ३० लाख टन भातपीक खरेदी करण्याचे ठरवले होते. मात्र, आतापर्यंत यापैकी फक्त १७.१३ लाख टन भातपिकाची खरेदी झाली आहे. नियमानुसार, शेतकरी २०० क्विंटल भातपीक सरकारी खरेदी विक्री केंद्रावर विकू शकतात. त्यानुसार बिहारमध्ये १५ नोव्हेंबरला भातपीक खरेदी सुरू झाली होती. भातपीक विकण्यासाठी जवळपास ३ लाख ९७ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, ३ लाख ८४ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर २१ मार्चपर्यंत २ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी भातपीक विकले. मात्र, अद्यापही नोंदणी केलेले १ लाख ४६ हजार शेतकरी भातपीक विकू शकले नाही. त्यातच कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे भातपीक विक्री केंद्र देखील बंद आहेत. परिणामी, शेतकरी संकटात सापडला आहे.