नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्याविरोधी शेतकरी आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. दिल्ली सरकारने बुराडी परिसरात आंदोलन करण्यासाठी परवानगी दिल्यानंतरही शेतकऱ्यांनी सीमेवरच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सिंघु सीमेवर स्वराज अभियानचे संस्थापक सदस्य योगेंद्र यादव यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांना मान्य नाही. सरकार जर आपला अहंकार सोडून चर्चा करण्यास तयार असेल. तर शेतकरी चर्चेच्या माध्यमातून काही मार्ग काढतील, असे योगेंद्र यादव म्हणाले.
सरकार काहीच अटी न ठेवता शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार असेल. तर शेतकरी चर्चा करतील. जोपर्यंत सरकार अहंकार सोडत नाही. तोपर्यंत सिंघू सीमेवर आंदोलन करू. शेतकऱ्यांसोबत तीन डिसेंबरला चर्चा करण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दाखवली आहे. मात्र, त्यासाठी आधी शेतकऱ्यांनी आंदोलनाची एक जागा निश्चित करावी अशी अट त्यांनी घातली आहे, असे यादव यांनी सांगितले.
बुराडीमध्ये न जाण्यावर शेतकरी संघटना ठाम -
दिल्लीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकार दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक देत असल्याचे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. तर आंदोलनाची पुढील रणनीती काय असणार हे ठरवण्यासाठी दररोज सकाळी 11 वाजता बैठक घेण्याचा निर्णय कृषी संघटनांनी घेतला आहे. शेतकरी आंदोलनासाठी येताना जवळपास महिनाभर पुरेल एवढे सामान घेऊन आले आहेत. बुराडीमध्ये न जाण्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत.