लखनौ - सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरातील डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांचा उपचार डॉक्टर करत आहेत. अशातच काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ले देखील झाले आहेत. त्यामुळे या डॉक्टरांच्या कुटुंबियांना आता चिंता सतावत आहे. गाजियाबादमधील एक महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना देखील आपल्या मुलीची काळजी वाटत आहे.
गाजियाबाद येथील निलिमा वर्मा या दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टर आहेत. कोरोना आणि डॉक्टरांवर होणाऱया हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एक आई म्हणून मुलीची प्रचंड काळजी वाटत असल्याचे निलिमा यांच्या आईने सांगितले.
मात्र, त्याच वेळी तिचा अभिमानही वाटत आहे. देशाला आणि समाजाला गरज असताना निलिमा आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. नागरिकांनी देखील याची जाणीव ठेवली पाहिजे. डॉक्टरदेखील कुणाच्या तरी कुटुंबातील सदस्य असतात, त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे, अशा भावना निलिमा यांची आई उमा वर्मा यांनी व्यक्त केल्या.