नवी दिल्ली - सोशल मीडिया साइट फेसबुकवर आता 'काळजी घ्या' दर्शवणारा नवा ईमोजी दाखल होणार आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा ईमोजी बनवण्यात आला आहे. लवकरच सर्व वापरकर्त्यांना त्याचा उपयोग करता येणार आहे.
आत्तापर्यंत फेसबुकवर वापरकर्त्यांना लाईक, लव्ह, सॅड, हाहा, अँग्री आणि वाव हे पर्याय उपलब्ध होते, त्यामध्ये आता 'केअर' म्हणजेच काळजी घ्या दर्शवणारा इमोजी वाढवण्यात येणार आहे.
फेसबुकचे 'ईएमईए टेक कॉम्स मॅनेजर' अलेक्झांड्र्यू व्हायसा यांनी ट्विटरद्वारे कंपनी 2 नवे फिचर सुरू करत असल्याची माहिती दिली. लाईक आणि मेसेंजर या दोन्ही ठिकाणी हा इमोजी येणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत तो सर्वांना वापरता येईल, कोरोना विषाणूच्या काळात लोकांना भावना व्यक्त करण्यासाठी हा ईमोजी आणला आहे, असेही ते म्हणाले.
सर्वजण सध्या कठीण काळाचा सामना करत आहेत. यामध्ये लोक आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या सोबत असल्याचे यातून दर्शवता येईल. यासाठी हा नवीन इमोजी काम करू शकतो. दिल म्हणजेच हार्टला हग करताना दिसणारा हा नवा ईमोजी असेल.