नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने शुक्रवारी पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांनी वाढ केली. जन सुरक्षा कायद्यांतर्गत ही वाढ करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मुफ्ती यांच्या नजरकैदेच्या मुदतीतील वाढ हा कायद्याचा दुरुपयोग आणि संवैधानिक अधिकारांवरील हल्ला असल्याचे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी मुफ्ती यांना ताबडतोब सोडावे, अशी मागणी केली आहे.
‘कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांसोबत फिरणाऱ्या एका 61 वर्षीय माजी मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक सुरक्षिततेला धोका कसा पोहोचू शकतो? मुफ्ती यांनी त्यांना नजरकैदेतून सोडण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी मानण्यास नकार दिला. कोणत्याही स्वाभिमानी राजकीय नेत्याने असेच केले असते. तसेच, त्यांची नजरकैद वाढवण्याचे आणखी एक कारण दिले गेले. ते म्हणजे, त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग.. हे कारण तर हास्यास्पद होते..!’ असे ट्विट चिदंबरम यांनी शनिवारी केले.
'त्यांनी (मुफ्ती) आपण आर्टिकल 370 रद्द केल्याच्या विरोधात काही बोलणार नाही, असे का बरे लिहून द्यावे? हा भाषण स्वातंत्र्याचा भाग नाही का? मी स्वतः आर्टिकल 370 रद्द करण्याच्या विरोधात केलेल्या याचिकेच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात बोलणारा वकील आहे. जर मी आर्टिकल 370 विरोधात बोललो… जे मी केलेच पाहिजे.. तर, तोही सार्वजनिक सुरक्षेला धोका ठरेल का? आपण सर्वांनी एकत्रितपणे मेहबूबा मुफ्ती यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी आवाज उठवला पाहिजे,' असे चिदंबरम म्हणाले.
मुफ्ती यांच्या नजर कैदेची मुदत येत्या पाच ऑगस्टला संपत होती. आता ही मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. याआधीही 5 मे रोजी त्यांच्या नजरकैदेची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. गृह खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार मुफ्ती यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान ‘फेअरव्ह्यू बंगलो’ येथे आणखी तीन महिने नजर कैदेत राहावे लागणार आहे. त्यांना तुरुंगाऐवजी घरीच नजर कैदेत ठेवण्याची सवलत (subsidiary jail) मिळाली आहे.
मुफ्ती यांना मागील वर्षी पाच ऑगस्टपासून त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या दिवशी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द करण्यात आले होते. यानंतर शेकडो लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या विविध नेत्यांचाही समावेश होता. यातील बहुतेक मुख्य प्रवाहातील नेत्यांची सुटका झाली आहे. यात फारुक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.