नवी दिल्ली - भारताने बालाकोट येथे हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने पूर्व भागातील हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयावर हवाई तज्ञांनी कठोर प्रतिक्रिया दिला आहे. पाकिस्तानने भारताच्या व्यावसायिक विमानांना हवाई क्षेत्रातून परवानगी नाकारल्यामुळे अंदाजानुसार भारताचे आतापर्यंत जवळपास ४३० कोटींचे नुकसान झाले आहे.
विमान क्षेत्रातील तज्ञ सनत कौल यांनी पाकिस्तानच्या हवाईक्षेत्र बंद करण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे. कौल म्हणाले, प्रत्येक देशाच्या हवाई क्षेत्राची सीमा असते. आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटनेच्या (आयसीओए) अंतर्गत अनेक सामजंस्य कराराद्वारे प्रत्येक देशाला एकमेकांच्या हवाईक्षेत्रातून व्यावसायिक उड्डाणे घेण्याची परवानगी असली पाहिजे. भारताच्या व्यावसायिक विमानांना पाकिस्तानच्या हवाईक्षेत्रातून परवानगी नाकारणे चुकीचे आहे. आयसीओएने यासंदर्भात हस्तक्षेप केला पाहिजे. भारताच्या व्यावसायिक विमानांसाठी हवाईक्षेत्र बंद करुन पाकिस्तान बालाकोट हल्लाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, भारताने यामध्ये अजून सक्रियता दाखवत आयओसीएवर हवाईक्षेत्र खुले करण्यासाठी दबाव टाकला पाहिजे.
पाकिस्तानचे हवाई खात्याचे सचिव नुसरत यांनी माहिती देताना सांगितले आहे, की भारतीय वायुसेना त्यांच्या सीमेजवळील विमानतळावरुन लढाऊ विमानांना हटवत नाही तोपर्यंत पाकिस्तानचे हवाईक्षेत्र भारतासाठी खुले होणार नाही.