नवी दिल्ली - गेल्या जून महिन्यापासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशादरम्यान झालेल्या करारानुसार आमचे सीमेवरील परिस्थितीवर लक्ष असून तणाव चर्चेतून सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे चीनने म्हटलं आहे. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चीनने नुसत्या तोंडाच्या वाफा दवडू नये. कृतीही करावी, असे श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जी परिस्थिती आहे. ती चीनच्या कारवायांमुळे निर्माण झाली आहे. चीन द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करत आहे. दोन्ही देशांनी करारानुसार नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. चीनकडून सैन्य तैनातीचे काम 1993 आणि 1996 च्या कराराविरूद्ध आहे. आपले सशस्त्र दल याचे काटेकोरपणे पालन करत आहे, परंतु चीनच्या बाजूने हे होताना दिसत नाही, असे श्रीवास्तव म्हणाले.
चीनचा सामना करण्यास लष्कर सज्ज -
भारत चीनमधील संबंधही ताणले आहेत. चीनने पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीमेवर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर एकमेकांसमोर ठाकले आहे. भारताने चिनी अतिक्रमण रोखण्यासाठी सीमेवर शस्त्रसामुग्री जमा केली आहे. चीनचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असून सीमेवर T-90, T-72 रणगाडे तैनात केले आहेत. भारताने मागील काही दिवसांत मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवल्याने चीनच्या हालचालींवर दुरून लक्ष ठेवता येत आहे.
हेही वाचा - जे. पी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक प्रकरणी सात जणांना अटक