जगभरात थैमान घातलेला कोरोना आता हळूहळू भारतातही पसरत आहे. देशात सध्या याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. तो तिसऱ्या टप्प्याकडे जाऊ नये, यासाठी सरकार अनेक निर्णय घेत आहे. जनतेनेही या आणीबाणीच्या काळात खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे, चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत चालला आहे. चीनने या विषाणूशी कसा लढा दिला, भारताने आणि भारतीयांनी त्यातून काय शिकायला हवे, तसेच चीनमध्ये आता कशी परिस्थिती आहे, या सर्व गोष्टींबद्दल चीनमधील अनिवासी भारतीय संघटनेच्या शांघाय शाखेचे माजी अध्यक्ष, अमित वाईकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. पाहूया त्यांच्या या विशेष मुलाखतीचा चौथा भाग..
प्रश्न - चीनमधील एकंदर आरोग्य व्यवस्था कशी आहे? भारताच्या आरोग्यव्यवस्थेमध्ये आणि त्यात काय फरक जाणवतो?
अमित - चीनमधील चिकित्साप्रणाली किंवा आरोग्य व्यवस्था ही भारताहून पूर्णपणे वेगळी आहे. इथे साधारणपणे ९५% आरोग्यव्यवस्था ही सरकारी आहे. तेवढेच नाही, तर चीनमध्ये बहुतांश गोष्टी सरकारीच आहेत. त्यामुळेच देशाची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये एखादा निर्णय घेतला गेला की, तो संपूर्ण चीनमध्ये लागू होतो. याच गोष्टीचा सरकारला कोरोनाशी लढा देताना फायदा झाला.
काही लोकांनी ऐकले असेल, की सुरुवातीला जेव्हा या विषाणूचा वुहानमध्ये किंवा हुबेई प्रांतामध्ये उद्रेक झाला, तेव्हा सरकारला परिस्थिती हाताळण्यास अडचण आली. त्याला कारण म्हणजे, वुहानमध्ये असणारी रुग्णालये अशा भीषण स्वरूपाच्या आजाराला हाताळण्यासाठी तयार नव्हती. मात्र, सर्वकाही सरकारच्या हातात असल्यामुळे, अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी 'मेक शिफ्ट' रुग्णालये उभी केली. तसेच, देशाच्या इतर भागामधून १० ते १५ हजार डॉक्टर आणि नर्सेस या वुहानमध्ये पाठवण्यात आल्या.
शांघायमध्ये आणि इतर भागांमध्येही खासगी रुग्णालयांना बंद करण्यात आले होते. आतासुद्धा केवळ जनरल रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी या रुग्णालयांना देण्यात आली आहे. तेही केवळ त्याच रुग्णालयांना परवानगी दिली आहे, ज्यांच्याकडे रुग्णांना दाखल करून घेण्याची सोय आहे. छोट्या दवाखान्यांवर मात्र अजूनही बंदी आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांवर मात्र केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना वेगळे ठेऊन, त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाले आहे.
प्रश्न - चीन सरकारने वुहानमध्ये केवळ १५ दिवसांमध्ये भव्य रुग्णालय उभारले, अशा बातम्या आपण सर्वांनी ऐकल्या. मात्र, त्यानंतरही चीनमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच होती. चीन सरकारने आयोजलेल्या उपाययोजना अयशस्वी ठरल्या का?
अमित - चीनच्या हुबेई प्रांतामधील वुहान हे शहर आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हे शहर जगाच्या नकाशावर आले. साधारणपणे २५ जानेवारीला चीनने देशभरात आरोग्य आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर, मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या बातम्या आम्हाला समजत होत्या. बातम्यांचे प्रमाण एवढे होते, की त्यापैकी खरी बातमी कोणती आणि खोटी कोणती हेच समजायला मार्ग नव्हता. त्यातच आम्हाला समजले, की चीन पंधरा दिवसांमध्ये साधारणपणे हजार बेड्सचे एक रुग्णालय उभारत आहे. सुरुवातीला आम्हाला ही अफवा वाटली. मात्र, त्यानंतर वुहानमधील आमच्या काही मित्रांनी त्या रुग्णालयाची छायाचित्रे आम्हाला पाठवली. तेव्हा आम्हाला खात्री पटली, की चीनने खरेच ही कामगिरी पार पाडली आहे. साधारणपणे चार फेब्रुवारीला यात पहिला रुग्ण दाखल झाला, आणि हे रुग्णालय सुरूही झाले.
याबाबत कोणतीही शंका नाही, की चीनची उपाययोजना चांगली होती. भारतातील काही मित्रांना वाटत असेल, की चीन सरकारने आवश्यक ती पावले उचलण्यास उशीर केला, आणि त्यामुळे याचा प्रादुर्भाव वाढला. मात्र लक्षात घ्या, की वुहानमध्ये त्यावेळी हजारो लोक रुग्णालयांमध्ये दाखल होत होते. कोणत्याही शहरामध्ये अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना दाखल करून घेण्याची सोय नसते. आज इटलीमध्ये काय होत आहे, ते तुम्ही पाहतच आहात. खरेतर चीनमधील उद्रेकानंतर या देशांना तयारीसाठी पुरेसा वेळ होता. तरीही तिथे आज अशी परिस्थिती आहे. चीनकडे तर तसा वेळ नव्हता, तरीही त्यांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळली.
चीनने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने कोरोनासाठी वेगळी रुग्णालये उभारली. कारण, बाकी रुग्णालयांमध्ये असणारे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, आणि इतर रुग्णांचे नातेवाईक यांनाही कोरोनाच्या रुग्णांमुळे विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. या सर्वांना धोक्यात टाकण्यापेक्षा, कोरोनासाठी वेगळे रुग्णालय उभारण्यावर चीनने भर दिला. हा विचारही कितीतरी देशांनी केला नसता.
अमितजींशी आपण चीनमधील त्यांच्या अनुभवासंबंधी आणखीही चर्चा केली आहे. पुढील भागामध्ये आपण अमितजींचा मुलगा अनीश याचा शाळेबाबतचा अनुभव जाणून घेणार आहोत. तसेच, भारतीयांनी आता काय खबरदारी घ्यावी याबाबतही ते मार्गदर्शन करतील.