हैदराबाद - महाराष्ट्रात आज (शुक्रवार) २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत... राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शाळा 3 ऑगस्टपासून सुरू होतील, अशी स्थिती असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले... संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी तिथे भाषण केले... अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याची माहिती मिळत असल्याचे आज(शुक्रवार) लष्कराने म्हटले आहे... यासह राज्यातील आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा...
- मुंबई - कोरोना महामारीचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (शुक्रवार) सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात आज ८ हजार ३०८ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे.
सविस्तर वाचा - राज्यात सलग तिसऱ्या दिवशी ८ हजाराहून अधिक कोरोनारुग्ण, २५८ मृत्यूंची नोंद
- गडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शाळा 3 ऑगस्टपासून सुरू होतील, अशी स्थिती आहे. त्याअगोदर सर्व शाळा सॅनिटाईझ करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे शुक्रवारी दिली.
सविस्तर वाचा - राज्यातील शाळा 3 ऑगस्टला सुरू होणार - विजय वडेट्टीवार
- नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी तिथे भाषण केले. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये ते बोलत होते. या परिषदेच्या वार्षिक उच्चस्तरीय सभेमध्ये जगभरातील विविध प्रतिनिधी उपस्थित असतात. यात वेगवेगळ्या देशांचे सरकारी प्रतिनिधी, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी, तसेच नागरी समाज आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असतो. यावर्षीच्या या सभेचा विषय आहे - 'कोरोना काळानंतरची बहुपक्षीयता : संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आपण काय अपेक्षा ठेवतो.'
सविस्तर वाचा - '२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर छत असेल'; पंतप्रधानांचा दावा..
- मुंबई - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्याला हलका ताप आल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्या आणि आराध्या या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, आज (शुक्रवार) ऐश्वर्याला हलका ताप आला असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अगोदरच ऐश्वर्या राय बच्चनचे सासरे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि तिचे पती अभिषेक बच्चन यांनाही कोरोना झाला असल्याने, उपचारासाठी नानावटी रुग्णालयातच दाखल केले आहे
सविस्तर वाचा - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासह नानावटी रुग्णालयात दाखल
- मुंबई - राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत. असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सविस्तर वाचा - 'राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी ५०० कोटी रूपये जमवले'
- मुंबई - राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. महाविकास आघाडीच सरकार 5 वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राऊत बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मत जाणून घेतली.
सविस्तर वाचा - 'राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरतोय'
- श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याची माहिती मिळत असल्याचे आज(शुक्रवार) लष्कराने म्हटले आहे. मात्र, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचा विश्वास लष्कराकडून देण्यात आला आहे. जानेवारीपासून लष्कराने काश्मीर खोऱ्यात सव्वाशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यासाठी अनेक ऑपरेशन राबविण्यात आले असून त्यात लष्कराला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.
सविस्तर वाचा - अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; शांततेत यात्रा पार पाडण्यासाठी लष्कर सज्ज
- नवी दिल्ली : राहुल गांधींनी देशाचे परराष्ट्र व्यवहार कमकुवत होत चालल्याची टीका केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर प्रसाद यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिले आहे. मोठ्या देशांशी असलेले भारताचे संबंध अजूनही मजबूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशिया, चीन, जपान आणि अमेरिका सारख्या देशांशी आपले चांगले संबंध असून, आपण वेळोवेळी परिषदा आणि चर्चा सत्रे आयोजित करत आहोत, असे ते म्हणाले.
सविस्तर वाचा - 'देशाचे परराष्ट्र संबंध मजबूतच'; जयशंकर प्रसादांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर..
- मुंबई- कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या परिस्थितीचा विचार करता प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणतीही शिथिलता देता येणार नाही. त्यामुळे या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरले. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
सविस्तर वाचा - 'घरीच नमाज अदा करा', बकरी ईद साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
- नवी दिल्ली : भारत- चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज(शुक्रवार) लडाखला भेट दिली. सिंह यांनी सीमेवरील लुकुंग या फॉर्वर्ड पोस्टवरील जवानांशी संवाद साधला. सरसेनाध्यक्ष बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे त्यांच्यासोबत होते. संरक्षण मंत्र्यांनी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच जवानांचे मनोबल वाढविले.
सविस्तर वाचा - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर; लष्करी सज्जतेचा घेतला आढावा