हैदराबाद - महाराष्ट्रात आज (बुधवार) कोरोनाच्या तब्बल ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले... बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन होणार जाहीर... बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली... पुण्यातील ससून रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे... देशभरामध्ये काल (मंगळवारी) विक्रमी संख्येने कोरोनाची नमुन्यांची तपासणी करण्यात आली... जालना जिल्ह्यातील सतीश सुरेश पेहरे यांना लडाखमध्ये वीरमरण आले आहे... यासह वाचा राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या दहा घडामोडी.
- मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेले दोन दिवस ६ हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढल्यानंतर आज तब्बल कोरोनाच्या ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या राज्यात १ लाख ११ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, राज्यात आज ३ हजार ६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा - राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पावणे तीन लाखांच्या पुढे.. आज ७ हजार ९७५ नव्या रुग्णांची नोंद
- मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या रूपाने अभूतपूर्व असं 'सत्ताकारण' पाहायला मिळालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पूर्णपणे भिन्न विचारसरणीच्या पक्षांसोबत शिवसेनेने आघाडी करत भाजप या आपल्या जुन्या मित्राला शह दिला. ही राजकीय उलथापालथ ज्यांनी घडवली ते महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि त्यांना यात साथ देणारे त्यांचे शिवसेनेतील विश्वासू संजय राऊत यांनी एका वादळी मुलाखतीचा 'बॉम्ब' टाकल्यानंतर आता संजय राऊत दुसरा बॉम्ब टाकणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दणकेबाज मुलाखत लवकरच प्रसारित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सविस्तर वाचा - विशेष: संजय राऊतांचा आता दुसरा बॉम्ब , शरद पवारानंतर उद्धव ठाकरेंची तडाखेबंद मुलाखत
- मुंबई - बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. अस्लम शेख म्हणाले की, कंटेंन्मेंट झोनमध्ये कोणतेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल. बकरे खरेदी-विक्रीसाठी सरकारच्यावतीने ऑनलाईन प्रणाली स्थापित केली जाईल. कुर्बानीसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई असेल. देवनार मंडीसारख्या मोठ्या मंडींना परवानगी देण्यात येणार नाही. मार्केट केवळ खुल्या मैदानातच लावले जाईल, असेही शेख यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - बकरी ईद संदर्भात मार्गदर्शक तत्वे लवकरच - मंत्री अस्लम शेख
- मुंबई - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या (गुरुवार दि. 16 जुलै) रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठीची घोषणा आज (बुधवार) राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली.
सविस्तर वाचा - धाकधूक वाढली... बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन होणार जाहीर
- पुणे- पुण्यातील ससून रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे 2 च्या सुमारास घडली. मृत्यूनंतर केलेल्या कोरोना चाचणीत शास्त्रज्ञ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस, प्रवक्ते रमेश अय्यर यांनी दिली आहे.
सविस्तर वाचा - व्हेंटिलेटर अभावी पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू
- नवी दिल्ली - देशभरामध्ये काल (मंगळवारी) विक्रमी संख्येने कोरोनाची नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एकाच दिवसात तब्बल 3 लाख 20 हजार नमुने तपासण्यात आले. 14 जुलैपर्यंत (मंगळवार) देशात 1 कोटी 24 लाख 12 हजार 664 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने सांगितले.
सविस्तर वाचा - मंगळवारी दिवसभरात देशात सर्वात जास्त कोरोना चाचण्या, आयसीएमआर
- जालना - जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील रहिवासी असलेले जवान सतीश सुरेश पेहरे (28) यांना लडाख येथील एका भीषण अपघातात वीरमरण आले आहे. मूळ बुलढाणा जिल्ह्यातील सुरेश पेहरे हे जालन्यात स्थायिक झाले होते. लष्करात पूल बांधकाम विभागामध्ये अभियंता म्हणून ते कार्यरत होते. लडाखजवळील शाखा नदीच्या पुलावर बांधकाम सुरु असताना घडलेल्या अपघातात पेहरे यांना वीरमरण आले आहे.
सविस्तर वाचा - लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; जालना जिल्ह्यावर शोककळा
- मुंबई - संपूर्ण भारतीय असलेले 5 जीओचे तंत्रज्ञान रिलायन्स जिओकडे तयार असल्याचे अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले आहे. रिलायन्सच्या ऑनलाइन वार्षिक सभेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, की स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यानंतर भारतामध्ये तयार झालेले 5जी तंत्रज्ञान लॉन्च करण्यात येणार आहे. 4जी हे 5जी मध्ये अद्ययावत करणे सोपे असल्यााचे यावेळी अंबानी यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - जिओचे स्वदेशी 5जी तंत्रज्ञान तयार; मुकेश अंबानींची मोठी घोषणा
- मुंबई - दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 9 लाखांच्या पुढे गेला आहे. अशात आता कोरोना योद्धे अर्थात डॉक्टरच मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत देशात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या 99 डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर 1 हजार 309 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाचा मृत्यूदर 5 टक्के असताना आयएमएच्या डॉक्टरांचा मृत्यूदर 10 टक्के असल्याने आयएमएने यावर चिंता व्यक्त केली आहे. तर आता आपल्या सर्व डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी करत अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे.
सविस्तर वाचा - देशात 99 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 1 हजार 302 जणांना लागण
- गांधीनगर : ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट यांच्या रुपाने राहुल गांधींनी आपले दोन्ही हात गमावले आहेत, असे मत गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी व्यक्त केले आहे. तसेच अशा रितीने कमकुवत झालेली काँग्रेस ही भाजपसाठी फायद्याची आहे, असेही ते म्हणाले. मध्यप्रदेशमध्ये काय झाले ते आपण सर्वांनी पाहिलेच. आता त्याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत आहे. यातून हेच दिसून येते की काँग्रेसच्या नेतृत्त्वात काहीतरी चुकीचे आहे, असे पटेल यावेळी म्हणाले.
सविस्तर वाचा - ' ज्योतिरादित्य आणि सचिनच्या रुपाने राहुल गांधींनी आपले दोन्ही हात गमावले..'