हैदराबाद - राज्यात आज (सोमवार) कोरोनाच्या ५ हजार ३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली... नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे... केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार हे आरक्षण विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवार) अकोला येथे केला... सारथी संदर्भात जे आरोप केले जात आहेत, ते चुकीचे असून यासंदर्भात राजकारण केलं जातं असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (सोमवार) मातोश्री येथे बैठक झाली... यासह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या दहा घडामोडी वाचा एका क्लिकवर...
मुंबई - गेली चार दिवस सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी राज्यात चार दिवसांपासून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत, आज कोरोनाच्या ५ हजार ३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर - राज्यात 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित; तर 204 मृत्यू
नवी दिल्ली : कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राज्यात विद्यापीठ आणि त्याअंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता, परंतु त्यावर आज केंद्रीय गृह मंत्रालयाने तोडगा काढला आहे. देशातील विद्यापीठ आणि खाजगी संस्थांना आपल्या सर्व अंतिम परीक्षा घेण्यासाठीची परवानगी देण्यासाठी आज गृहमंत्रालयाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांना एक पत्र लिहून ही माहिती दिली आहे. या परीक्षा सोबतच देशभरामध्ये उच्च शिक्षणाचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यासंदर्भात सुद्धा केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सविस्तर वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी..
ठाणे - मुंबईतील पोलीस उपायुक्त बदल्यांच्या गोंधळात राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावाबरोबरच मुख्यमंत्री-मंत्र्यांमधील अविश्वास उघड झाला. राज्य सरकारमधील प्रत्येक जण मीच प्रमुख असल्याच्या अविर्भावात असून, सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
सविस्तर वाचा - प्रत्येकाला वाटते सरकारमध्ये मीच प्रमुख; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका
नागपूर- महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या महिला सेक्रेटरींनी महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंढे यांनी अपमानजनक वागणूक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यावरून महिला आयोगाने मुंढे यांना नोटीस बजावत 7 दिवसांमध्ये आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
सविस्तर वाचा - महिलेच्या तक्रारींवरून मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस
अकोला - केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार हे आरक्षण विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवार) अकोला येथे केला. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याबाबत अधिक बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, 'आरक्षण पूर्णपणे संपवण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यांच्या धोरणामुळे 11 हजार ओबीसी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिले आहेत' असे म्हटले आहे.
सविस्तर वाचा - 'नरेंद्र मोदींचे सरकार आरक्षण विरोधी..तर, हिंदू असूनही ओबीसींवर अन्याय'
मुंबई - महाराष्ट्राने दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा 2 लाखांचा टप्पा ओलांडला. सोमवारी राज्यात आढळलेल्या नवीन 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधितांसह राज्यात आजमितीस 2 लाख 11 हजार 987 कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या म्हणजेच वाढता प्रादुर्भाव ही बाब शासन, प्रशासनासह ठिकठिकाणच्या आरोग्य यंत्रणांच्याकरिता चिंतेची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे या शहरातील आरोग्य यंत्रणेची कोरोनासोबत लढण्यासाठी केलेली तयारी किंवा आरोग्य यंत्रणेची सध्या असलेली स्थिती, याचा ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला आहे.
सविस्तर वाचा - राज्यात 2 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण; पाहा प्रमुख शहरांमधील आरोग्य यंत्रणांची तयारी
नागपूर - सारथी संदर्भात जे आरोप केले जात आहेत, ते चुकीचे असून यासंदर्भात राजकारण केलं जातं असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. सारथी बंद करण्यासंदर्भांत जे आरोप माझ्यावर केले, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला वाटत असले, तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी आणि माझ्याकडून हे खातं काढून घेण्याची मागणी करावी, मराठा समाजातील एखाद्या मंत्र्यांकडे सारथीची जबाबदारी द्यावी, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
सविस्तर वाचा - 'मी ओबीसी आहे, म्हणून सारथी विरोधी म्हणणे चुकीचे; माझ्याकडून खातं काढून मराठा मंत्र्याला द्या'
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (सोमवार) मातोश्री येथे बैठक झाली. पोलीस उपायुक्तांच्या १० अंतर्गत बदल्यांवरून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेल्या मतभेदाचे पडसाद मातोश्रीवर उमटले. शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत बदली प्रकरणावरून पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. तसेच यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही हजर होते.
सविस्तर वाचा - शरद पवार-उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट; मुख्यमंत्री कार्यालयाच्या 'त्या' हस्तक्षेपाबाबत झाली चर्चा
मुंबई - महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत निशाणा साधला. राज्यात असणाऱ्या सध्याच्या परिस्थितीला हे सरकार जबाबदार आहे, असा हल्लाबोल राणे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त मातोश्री पुरते आहेत, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
सविस्तर वाचा - 'मुख्यमंत्री फक्त मातोश्रीपुरतेच; सध्याच्या स्थितीला ठाकरे सरकार जबाबदार'
मुंबई - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीर्घ लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सलून सुरू झाल्यानंतर आज हॉटेल व्यावसायिकांची मागणी लक्षात घेऊन आता हॉटेल आणि लॉजिंग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 8 जुलैपासून 33 टक्के क्षमतेसह हॉटेल आणि लॉज सुरू केले जाणार आहेत. राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी हॉटेल आणि लॉज सुरू करता येणार नाही, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - सलूननंतर आता हॉटेल अन् लॉज चालवायला हिरवा झेंडा, राज्य सरकारचा निर्णय