गांधीनगर(भरुच) - कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन अनेकांना त्रासदायक वाटत आहे. मात्र, गुजरातच्या भरुच येथील १० ज्येष्ठ नागरिकांसाठी हा लॉकडाऊन आनंद देणारा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी ईटीव्ही भारतने वृद्धाश्रमात राहणाऱ्या नागरिकांबाबत एक स्पेशल रिपोर्ट केला होता. त्यानंतर या १० ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना आपल्या घरी परत नेले आहे.
कोरोनाचा देशात प्रवेश झाल्यानंतर अहमदाबादस्थित करुणा ट्रस्ट, या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेण्याची गरज या अहवालात व्यक्त केली होती.
भरुच येथील नर्मदा एज्यूकेशन आणि वेलफेअर ट्रस्टचे लक्ष या अहवालाकडे गेले. त्यांनी वृद्धाश्रमात राहणाऱ्या नागरिकांसाठी काम करण्याचे ठरवले. त्यांनी ईटीव्ही भारतच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर एक स्पेशल रिपोर्ट तयार केला. त्यानंतर १० ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना स्वत:हून घरी परत नेले.
कोरोना विषाणू सर्व नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मात्र, त्यामुळेच या १० ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आला आहे.