पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २८ ऑक्टोबरपासून मदतानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (रविवार) मधुबनी जिल्ह्यातील फूलपारस मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनाता दलाच्या (आरजेडी) घराणेशाही राजकारणावर प्रहार केला. संपूर्ण बिहार माझे कुटुंब असल्याचे नितीश कुमार म्हणाले.
बिहार माझं कुटुंब
काही व्यक्तींसाठी पत्नी, मुलगा, मुलगी म्हणजेच कुटुंब आहे. मात्र, माझ्यासाठी संपूर्ण बिहार कुटुंब आहे, असे म्हणत त्यांनी राजद पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. नागरिकांची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. बिहारची स्थिती वाईट होती. सगळीकडे गुन्हेगारीचे साम्राज्य पसरले होते. विकास दर जवळपास शून्य होता. आम्ही सर्व स्थिती नियंत्रणात आणली. न्यायासह विकासाच्या मार्गावर जाण्याचे मी पहिल्यापासून म्हणत आलो आहे, असे नितीश कुमार म्हणाले.
शिला मंडल फूलपारमधून जेडीयूच्या उमेदवार
फूलपारस मतदारसंघात जनता दल युनायटेड पक्षाने शिला मंडल यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसचे कृपानाथ ठाकूर आणि बिनोद कुमार सिंह लोक जनशक्ती पक्षाकडून उभे राहिले आहेत. २०१५ साली राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या गुलजार देवी निवडून आल्या होत्या. त्यामुळे यावेळी ही जागा मिळवण्यासाठी महागठबंधन प्रयत्न करत आहे.
तीन टप्प्यात होणार मतदान
बिहारमध्ये २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला ७१ विधानसभा जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजप आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.