भीलवाडा - हौसेला मोल नसते, हेच खरे! याचा प्रत्यय वारंवार येत असतो. लग्नसमारंभात तर प्रत्येकजण हटकून आपली हौस पुरवून घेत असतो. यात नवरदेव आणि नवरीचा पहिला नंबर लागतो. बँड-बाजा, घोड्यावरून वरात, डोली अशा हौशीखातर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. अशाच प्रकारची हौस राजस्थानातील भीलवाडा जिल्ह्यातील एका इंजिनिअर तरुणाने पुरवून घेतली आहे.
या तरुणाने आपली वरात चक्क हेलिकॉप्टरमधून वधूच्या घरी नेली. सुरेंद्र सिंह राठोड असे या इंजिनिअर तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील खुमान सिंह राठोड यांची मुलाच्या लग्नाची वरात हेलिकॉप्टरने नेण्याची इच्छा होती. या हौसेखातर त्यांनी ६ लाख ११ हजार रुपये हेलिकॉप्टरच्या एका दिवसाच्या भाड्यापोटी खर्च केले. वराचे कुटुंबीय भीलवाडा जिल्ह्यातील हुरडा पंचायत समितीच्या खेजडी पंचायतीतील मुरायला गावाचे रहिवासी आहेत.
हेही वाचा - राजस्थानातील मयंक सिंह बनला देशातील सर्वांत तरुण न्यायाधीश
ही वरात जिल्ह्यातील गंगापूर क्षेत्रातील अरनिया जागीर या गावी पोहोचली. नवऱ्यामुलाची वरात हेलिकॉप्टरने आल्यामुळे गावातील लोक हेलीकॉप्टर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विवाहस्थळी जमा झाले.
सुरेंद्र याचा विवाह येथील रहिवासी कुंदन सिंह चुंडावत यांची मुलगी टीना कंवर हिच्याशी झाला. या वराने आणि त्याच्या पित्याने वधूकडे पोहोचल्यानंतर केवळ एक रुपया आणि नारळासह वधूचा स्वीकार केला. वरपित्याने मुलाच्या लग्नाखातर मोठा खर्च केल्यानंतर वधूकडून हुंडा न घेतल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये सकारात्मक उदाहरण निर्माण झाले आहे. याचे लोकांकडून कौतुक होत आहे.