कानपूर (उत्तर प्रदेश) - आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम भारतात असल्याने त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढावा, अशी मागणी उन्नाव येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
'हिंदूंची धाकटी भावंडे समजावे'
पुढे ते म्हणाले, "पाकिस्तानपेक्षा भारतात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. म्हणून मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा त्वरित काढायला हवा. मुस्लिमांनी आता स्वतःला हिंदूंची धाकटी भावंडे समजून घ्यावे आणि त्यांच्याबरोबर देशात राहावे."
'निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवावे'
देशातील वाढत्या लोकसंख्येविषयी बोलताना ते म्हणाले, "वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी लवकरच संसदेत विधेयक मांडले जाईल. ज्यांना दोनपेक्षा जास्त मुले असतील त्यांना निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवण्यात येईल."
'विरोधी पक्षांवर टीका'
देशभरात सध्या शेतकरी कायद्यावरून रान उठले आहे. शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार मात्र हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. या मुद्द्यावरून त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास, शेतकरी कायद्याविषयी बोलण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.
'सर्वोच्च न्यायालयात जावे'
राम मंदिराप्रमाणेच काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांनी कृषी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जावे. मात्र तसे न करता ते निरपराध शेतकऱ्यांच्या खांद्यांवरून तोफ डागत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर केला.