श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यासोबतच, या चकमकीदरम्यान एका नागरिकाच्या पायालाही गोळी लागली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो आता धोक्याच्या बाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शस्त्रास्त्रांचा शोध सुरू..
चकमक झाल्यानंतर आता या परिसरात काही शस्त्रास्त्रे किंवा ग्रेनेड्स आहेत का याचा शोध सुरू आहे. दरम्यान, याठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याने परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच ही चकमक सुरू झाली होती.
दहशतवादी स्थानिकच..
आज ठार करण्यात आलेले दहशतवादी हे स्थानिक होते. हे सर्व अल-बद्रे या स्थानिक संघनटेशी संबंधित होते अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली.
यापूर्वी नागोर्तामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा..
यापूर्वी नागोर्तामध्येही १९ नोव्हेंबरला जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे दहशतवादी काही दिवसांपूर्वीच सीमेपलीकडून भारतात दाखल झाले होते.
हेही वाचा : 'दिल्ली चलो' आंदोलनाचा १४वा दिवस; सरकारच्या प्रस्तावानंतर ठरणार पुढील रणनीती..