लखनऊ - उत्तर प्रदेशातील विद्युत विभागाने हापुडमधील शमीम नावाच्या व्यक्तीला 1 कोटी 28 लाख रुपयांचे वीज बील पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपयांचे बील पाहिल्यानंतर त्याला धक्का बसला आहे.
वीजेचे कनेक्शन 2 किलोवॅटचे असूनही 1 कोटी 28 लाखांचे बील पाहिल्यानंतर शमीम यांना मोठा धक्का बसला. कोट्यवधी रुपयांचे बील दुरुस्त करण्यासाठी ते विद्युत विभागाच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शमीम यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. शमीम यांना दरमहा 700 ते 800 रुपये बील येत होते. मात्र, शमीम यांच्यापुढे कोट्यवधी रुपयांचे बील कसे भरणार हाच प्रश्न पडला आहे.
तांत्रिक चुकीमुळे कोट्यवधी रुपयांचे बील पाठवण्यात आले, असा खुलासा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. विद्युत विभागाने शेतकऱ्यांना चुकीची वीज बील पाठवल्याच्या घटना वारंवार घडत असताना आता हा नवीन प्रकार समोर आला आहे.