नवी दिल्ली - आचारसंहितेचा भंग केल्यावरून दाखल तक्रारीत पंतप्रधान मोदी यांना भारतीय निवडणूक आयोगाने सहाव्यांदा 'क्लीन चिट' दिली आहे. गुरुवारी पाटण येथे एका प्रचार सभेतील वक्तव्यावरून दाखल करण्यात आलेली तक्रारही आयोगाने आज फेटाळून लावली. यानंतर मोदींवरचे सर्वच आरोप आता निरस्त झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, काँग्रेसने लावलेल्या सर्व आरोपांना आयोगाने केराची टोपली दाखवली. मोदी यांनी २१ एप्रिलला पाटण येथे प्रचार करताना सैन्याचा उल्लेख केला होता. त्यावरून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात गुजरातच्या निवडणूक आधिकाऱ्यांनी सविस्तर तपशिल मागीतला होता.
दिलेल्या तपशिलाच्या आधारावर आयोगाने आचारसंहितेशी संबंधित विविध वक्तव्ये तपासून पाहिले. मात्र, तक्रारीच्या आधारावर ते खरे न उतरल्यामुळे आयोगाने त्यांच्यावरील हाही आरोप फेटाळून लावला. यापूर्वी त्यांच्या वरील ५ आरोपांना आयोगाने क्लीन चिट दिलेली आहे. यामध्ये लातूर आणि वर्ध्यांच्या भाषणांचाही समावेश आहे. या सभांमध्ये त्यांनी सैन्याच्या नावाचा उपयोग मतदान मिळवण्यासाठी केला होता, असा त्यांच्यावर आरोप आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात ६ खटले दाखल होते. त्यापैकी ९ एप्रिलला लातूर येथे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणाचाही समावेश आहे. त्यामध्ये त्यांनी युवकांना मतदान करते वेळी बालाकोट हवाई हल्ल्याच्या सन्मानार्थ मतदान करण्याचे आवाहन केले होते. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कोणत्याही राजकीय नेत्यांना भारतीय सैनिकांच्या नावावर मतदान मागण्यास बंदी आहे. मात्र, मोदी यांनी याचे उल्लंघन केले, असे म्हटले जात आहे.