पाटणा - लोकप्रतिनिधींची निवड करताना मतदारांनी त्याचे चारित्र्य, क्षमता आणि वर्तन पाहावे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ते बिहारमधील पाटणा विद्यापीठातील ग्रंथालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य, आमदार आणि खासदार या पदांवर लोकांची निवड करताना चारित्र्य, क्षमता, कुवत आणि वर्तन पाहावे. हे गुण असणाऱ्या व्यक्तीला आपले प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी. पण आपल्या राजकारण्यांकडे हे चार गुण नसतात. त्यांच्याकडे पैसा, जात, समाज आणि गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याचे दिसते. लोकांनी आपल्या प्रतिनीधीची निवड करताना या गोष्टींचा विचार करावा, असे आवाहन व्यंकय्या नायडू यांनी केले. पैसा, जात, समाजामध्ये तेढ निर्माण करणारे, गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांना दूर केले पाहिजे. जात, धर्म आणि लिंग यावरून कोणत्याही व्यक्तीचे शोषण केले जावू नये, असे व्यंकय्या नायडू म्हणाले.