अयोध्या - अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाप्रकरणी चालू महिन्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा बंदोबस्त करण्यात आल्याचे अयोध्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष तिवारी यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील 1 हजार 600 गावांमध्ये गुप्तचर यंत्रना मजबूत केली आहे. प्रत्येक गावांमध्ये 10 स्वयंसेवकांचा गट तयार करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे पोलीसांना वेळोवेळी प्रत्येक गावातील परिस्थितीची माहिती मिळत राहील. या सर्वांना एका अॅपच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. याचबरोबर सोशल माध्यमांवर पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक आशिष तिवारी यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधिश रंजन गोगोई या नोव्हेंबर १७ तारखेला निवृत्त होत आहेत. त्याआधी अयोध्या वादाप्रकरणी निकाल देण्याचे सुतोवाच त्यांनी दिले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. संपुर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागलेले आहे.
जिल्हाधिकारी अनुज झा यांनी अयोध्येत कलम 144 लागू केले आहे. काही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला. 10 डिसेंबर पर्यंत आयोध्येत कलम 144 लागू असेल.