विशाखापट्टनम - आंध्रप्रदेश पोलिसांनी रुग्णालयातून चालणाऱ्या अर्भक तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन प्रसिद्ध डॉक्टरांसह आठ जणांना अटक केली आहे. नवजात बालकांची विक्री होत असल्याप्रकरणी पोलिसांनी विशाखापट्टणम शहरातील सृष्टी फर्टिलिटी रिसर्च सेंटर आणि पद्मजा रुग्णालयावर कारवाई केली आहे.
डॉ. सी. एच पद्मजा, पद्मजा रुग्णालय आणि डॉ. एन नोका रत्नाम, असे आरोपी डॉक्टरांचे नाव आहे. शहरातील सृष्टी फर्टिलिटी आणि रिसर्च सेंटरमध्ये नवजात बालक विकल्याचा आरोप डॉक्टरांवर आहे. इतर आरोपीेंची माहिती पोलिसांनी उघड केली नाही.
पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त राजीव कुमार मीना यांनी सांगितले की, युनिव्हर्सल सृष्टी रुग्णालयाचे बालक तस्करी प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतरही, 30 जुलैला पोलिसांकडे आणखी एक तक्रार आली. छोडावरम येथील व्ही. लक्ष्मी नामक एका महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. या महिलेने सांगितले की, गर्भवती असताना नोव्हेंबर 2019 मध्ये छोडावरम येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले असता नोका रत्नाम या डॉक्टरशी ओळख झाली. सृष्टी युनिव्हर्सल रुग्णालयात डॉ. म्हणून कार्यरत असून मोफत ऑपरेशन करुन देऊ, अशी बतावणी या डॉक्टरने मला केली.
या डॉक्टरवर गर्भवती महिलेने विश्वास ठेवला. युनिव्हर्सल सृष्टी रुग्णालयात डिलीवरीसाठी भरती करण्यात आल्यानंतर महिलेला पद्मजा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे 31 जानेवारी 2020 ला महिलेने एका बाळाला जन्म दिला. मात्र, बाळ मृत असल्याचे डॉक्टरांनी महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना सांगितले. तसेच 3 फेब्रुवारीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. काही दिवसांनंतर व्ही. लक्ष्मी या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून रुग्णालयाने खोटी माहिती देऊन बाळ दुसऱ्या रुग्णालयात घेवून गेल्याचा आरोप रुग्णालयावर केला आहे.
या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्भक तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी किती बालकांची तस्करी रुग्णालयाने केली याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.