हैदराबाद - भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी हैदराबादमधील संयुक्त स्नातक परेडमध्ये भाग घेतला. सीमेवरील चीनची कारवाई स्वीकारहार्य नाही. कोणत्याही आकस्मिकतेस प्रतिसाद देण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठीही पूर्णपणे कटिबद्ध आहे. तसेच मी देशाला आश्वासन देतो की, गलवान खोऱ्यातील बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे भदौरीया परेडला संबोधित करताना म्हणाले.
सशस्त्र सेना सदैव तयार आणि सतर्क असल्याचे प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीने सूचित केले. गलवान खोऱ्यात सीमेचे रक्षण करताना ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या सैनिकांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत, भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची वचनबद्धता दर्शविली, असे ते म्हणाले.
लष्कराच्या चर्चेदरम्यान झालेल्या करारानंतर चीनने केलेली कृती अस्वीकारहार्य आहे. तसेच जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले असूनही, हा प्रश्न शांततेने सुटला पाहिजे यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचेही भदौरिया म्हणाले.
भारत-चीन सीमा वादात 20 भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये चीनने घुसखोरी केल्याचे पंतप्रधान मोदींनी नाकारले, तसेच सीमेवरील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला सर्व अधिकार दिले असल्याचे त्यांनी सांगितले.