पणजी - गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना शपथ दिली. नूतन मुख्यमंत्री सावंत यांनी अंत्योदय घटकाच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे शपथविधीनंतर सांगितले. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेल्या विकास योजना पुढेनेणार असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी कोकणी भाषेत शपथ घेतली.
महाराष्ट्रावादी गोवा पक्षनेते सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. डॉ. सावंत, जयेश साळगावकर, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, रोहन खंवटे, विजय सरदेसाई यांनी कोकणी भाषेत मंत्रीपदांची शपथ घेतली. सुदिन ढवळीकर, बाबू आजगावकर आणि मिलिंद नाईक यांनी मराठीत तर, विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो आणि नीलेश काब्राल यांनी इंग्रजीत शपथ घेतली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतरचा दुसरा दिवस गोव्यात वेगवान राजकीय घडामोडींचा ठरला. रिक्त झालेल्या जागेवर प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली. प्रमोद सावंत गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. ते गोव्यातील साखळी मतदार संघाचे भाजपाचे आमदार असूनव्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. डॉ. प्रमोद सावंत हे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते, असेही सांगितले जाते.
तत्पूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. विरोधी पक्षनेता चंद्रकांत कावळेलकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व १४ आमदार राजभवनात गेले आणि सिन्हा यांना निवेदन देत त्यांचा पक्ष विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष असून आम्हाला सरकार बनवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.