नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत एक उच्च स्तरीय बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री अश्वीनी कुमार चौबे, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, गव्हर्नर अनिल बजाज हे उपस्थित होते. दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आणखी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. चाचण्यांचा वेग आणि प्रमाण वाढवले पाहिजे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, कन्टेंनमेंट झोनमध्ये नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
मागील चोवीस तासांत दिल्लीत १ हजार ५०० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर आत्तापर्यंत एकूण २३ हजार ६४५ कोरोनाचे रूग्ण आढळले असून त्यातील १३ हजार ४९७ रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. दिल्लीतील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना चाचण्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. एक लाख लोकसंख्येमागे फक्त २ हजार १८ इतके हे प्रमाण आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले.
दिल्लीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे, ही बाब देखील चिंताजनक आहे. यातून किती वाईट पातळीवर उपाययोजना होत आहेत, हे समोर येते. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त आहे. त्याप्रमाणे त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. कोरोना संशयित रुग्णांना होम क्वारंटाईन करणे जास्त परिणामकारक दिसत नाही. त्यामुळे या गोष्टींकडे यंत्रणेने लक्ष देणे जास्त गरजेचे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.