जालना- वाढत्या स्पर्धेमुळे ब्राह्मण समाजात चिंतेचे वातावरण पसरत असल्याच्या अफवा येत आहेत. मात्र समाजाने आपली मनस्थिती बिघडू देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान कौशल्य विकास विभागाचे संचालक विवेक देशपांडे यांनी केले. ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
देशपांडे म्हणाले, ब्राम्हण समाजाने नोकरी करण्याची मनस्थिती बदलून उद्योजक होण्याची स्वप्ने पाहावीत, उद्योगांची निर्मिती करत अनेक हातांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सध्याचे सरकार हे चांगल्या विचारांना चालना देणारे आहे. त्यामुळे या सरकारचा देखील समाजाने उपयोग करून घेतला पाहिजे. एवढेच नव्हे तर पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना अपेक्षित असलेल्या क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी वाव दिला पाहिजे. त्यासाठी संकल्प करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ वर्तमानात आपण कोमात गेलोय-
आतापर्यंत देश घडविणारे आणि देशाला समृद्ध करणारे विचार पुरविण्याचे काम देखील याच समाजाने केले आहे. ते पुढे सुरू ठेवले पाहिजे. सद्यपरिस्थितीत राज्यामध्ये तरुणांच्या नोकरी संदर्भात चिंतेचे वातावरण दिसत आहे. मात्र समाजाने हे लक्षात घ्यायला हवे की, अशा परिस्थितीत संघर्ष केल्यावरच आपली गुणवत्ता सिद्ध होते. वर्तमानात आपण कोमात गेलेलो आहे, अशी मानसिकता समाजाची झाली आहे. परंतु हा गैरसमज समाजाने दूर करत, आपण कोण आहोत? हे लक्ष्यात घ्यायला हवे. त्यावर जर लक्षकेंद्रीत केले तर जग पादाक्रांत करणे अवघड नसल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार तसेच श्री चतुर्वेदेश्वर वेद आश्रम सावरगाव तालुका परतुर येथील वेदा अध्यापक, वेदशास्त्रसंपन्न देशिक शास्त्री कस्तुरे आणि जालना शहरातील वेदशास्त्रसंपन्न विनायक महाराज फुलंब्रीकर यांना समाज भूषण पुरस्कारने गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सौ. ज्योती धर्माधिकारी, पवन जोशी, अॅड. सुनील किनगावकर, सिद्धिविनायक मुळे, सचिन देशपांडे, गणेश अग्निहोत्री, संजय पाटील, बंकट खंडेलवाल, अमित कुलकर्णी, सुरेश मुळे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. आर .जोशी यांनी तर पाहुण्यांचा परिचय दीपक रणनवरे यांनी करून दिला.