करनाल - गाढव या प्राण्याला आपण सामान्यपणे तुच्छ लेखतो. कुणाला कमी लेखायचे असेल, तर तू गाढव आहेस असे म्हणतो. पण, या गाढवाचा कारनामा ऐकल्यावर तुमचे मत नक्कीच बदलेल. या गाढवाने हरियाणामध्ये आपल्या मालकाची मान अभिमानाने उंचावली आहे. संपूर्ण हरियाणा राज्यात एका गाढवाचाच डंका वाजत आहे.
ही कहाणी आहे हरियाणातील करनाल गावाची. या गावात अहसान मोहम्मद आणि रिजवान हे पिता - पुत्र राहतात. पशुपालनाचा व्यवसाय करत हे दोघे उदरनिर्वाह करतात. यांच्याकडे पोइटू जातीचा एक नर गाढव आहे. या पिता-पुत्रांचे नाव आज सर्व हरियाणात घेतले जात आहे. याचे कारण आहे हेच गाढव. या गाढवामुळे अहसान आणि रिजवान हे राज्यात सन्मानास पात्र ठरले आहेत.
हे गाढव राज्यस्तरीय पशुधन प्रदर्शनात सलग दोन वर्षांपासून अव्वल स्थान पटकावत आहे. यावर्षी झालेल्या प्रदर्शनात देखील एका गाढविणीसह या गाढवाने अव्वल दर्जा मिळवला. प्रथम स्थान मिळवल्याबद्दल त्याने आपल्या मालकाला ११ हजारांचे इनाम मिळवून दिले आहे.
अहसान आणि रिजवान आपल्या घराच्या अंगणात झोपडीत पाळीव पशुंना ठेवतात. त्यांच्याकडे अनेक प्रजातींचे गाढव, घोडे, शेळ्या, देशी गायी आहेत. या पशुंची देखरेख ते अत्यंत आवडीने आणि काळजीने करतात. या गाढवाने त्यांचे नाव राज्यात प्रसिद्ध केल्याने त्यांची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.