नवी दिल्ली- शेती, उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य विधेयकात एमएसपीबाबत (उत्पादन खर्चावर आधारित मिळणारा भाव) दुरुस्ती करून त्यात इतर नागरिकांनी शेतमाल खरेदी करताना तो एमएसपीच्या भावानेच खरेदी केला पाहिजे, यासाठी तरतूद करण्याची मागणी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज केली.
लोकसभेत शेती, उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२० वर चर्चा सुरू होती. यावर बोलताना निंबाळकर यांनी ही मागणी केली. यावेळी निंबाळकर यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती लोकसभेत मांडली. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळण्याची मागणी निंबाळकर यांनी केली.
शेती उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना आपला माल संपूर्ण भारतातील कुठल्याही बाजारपेठेत विकता येणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, छोटा भूभाग असलेल्या शेतकऱ्यांना इतर राज्यात आपला माल विकण्यासाठी पेट्रोल-डिझेलचा खर्च येणार. म्हणून शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी अनुदान देण्याची मागणी निंबाळकर यांनी केली.
तसेच, शेतकऱ्यांसाठी देशातील बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. मात्र, व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेतो, पण त्याला पैसे देत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांपासून माल घेणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी व्हावी, अशी मागणी करत विधेयकात याबाबत नियोजन केल्याने निंबाळकर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. त्याचबरोबर, देशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या वाढत्या भावाचा फायदा घेण्याचा अधिकार आहे. याबाबत सरकारने विचार करावा, असे मत खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- 'पोलीस भरती करताना मराठा समाजाला १३ टक्के जागा रिक्त ठेवू'