इंदूर - मूळ पाकिस्तानी असलेले भारतीय गायक अदनान सामी यांचा नुकताच 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कारावरून ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानी वायू दलात असताना सामींच्या वडिलांनी भारतावर बॉम्ब फेकले होते असे सांगत, त्यांनी या पुरस्कारावर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा - 'कुछ तो लोग कहेंगे'... अदनान सामींचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
याउलट, आसाममधील भारतीय सैन्य दलाचे अधिकारी सनाउल्लाह यांना कागदपत्र नसल्याने डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवल्याचा उल्लेख करत, त्यांनी एनआरसीवरून सरकारला धारेवर धरले. मध्ये प्रदेशातील इंदूरमध्ये 'संविधान वाचवा, देश वाचवा' या सभेत ते बोलत होते. अदनाम सामींना २०१६ मध्ये केंद्र सरकारने भारताचे नागरिकत्व दिले. यावरूनही त्याकाळी बराच वादंग उठला होता. त्यानंतर आता देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या 'पद्मश्री'ने सन्मान केल्याने अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : फाशीच्या स्थगितीविरोधात केंद्राच्या याचिकेवरील निकाल ठेवला राखून..
'अदनाम सामी एक कलाकार असल्याने त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे याबाबत मी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. त्यानंतर मोदी सरकारने नागरिकत्व दिले. मात्र, त्यांना 'पद्मश्री' देण्यात यावा, याबाबत मी सरकारला कधीही सुचवले नाही', असेही सिंह यावेळी म्हणाले.