नवी दिल्ली - आज सलग १५ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अनुक्रमे 35 आणि 60 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसात डिझेल आणि पेट्रोलमध्ये एकूण मिळून प्रति लीटर अनुक्रमे 8.88 रुपये आणि 7.97 रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबईत पेट्रोल 86.04 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 76.69 रुपयांनी विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर प्रती लिटर 78.88 वरून 79.23 वर पोहोचले आहेत. 01 नोव्हेंबर 2018 नंतरची ही दर वाढण्याची उच्च पातळी आहे. तर डिझेल 78.27 रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. शनिवारी डिझेलचा दर हा 77.67 एवढा होता. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे.
जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. तर, एकूण 15 दिवसांमध्ये पेट्रोल 7.97 रुपये व डिझेल 8.88 रुपये प्रति लिटर वाढले आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर लोकांचे जीवन थोड्याप्रमाणात रुळावर येत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढ होत आहे. येत्या काही दिवसात जनतेला कोरोनासह महागाईचा चटका सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.