लखनौ - व्यासपीठ हे भजनासाठी असते का? असा उलट सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. निवडणूक काळात आचार संहितेचा भंग केल्यानंतर आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्त संस्थेला मुलाखत देताना ते बोलत होते.
देश लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या काळात विविध पक्षांनी एममेकांवर शाब्दिक बाण चालवले होते. दरम्यान त्यांच्या वक्तव्यामुळे आयोगाने बसप अध्यक्ष मायावती, काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा आणि भाजप नेत्या मेनका गांधी यांच्यावर प्रचारबंदी लावली होती. त्यामध्ये आदित्यनाथ यांचाही समावेश होता.
एका मुलाखतीत आदित्यानाथ यांना त्यांच्यावर लावलेल्या प्रचारबंदीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर व्यासपीठ काय भजन करण्यासाठी असते का? असा उलटपक्षी प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर, व्यासपीठ विरोधकांना उखडून फेकण्यासाठी असते, असे स्पष्टीकरणही दिले.
लोकांपुढे विरोधी पक्षांची कमतरता दाखवणे हे आपले काम आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आपल्याला शिविगाळ करतात तेव्हा आपण मनावर घेत नाहीत. जेव्हा आम्ही त्यांच्यावर पलटवार करतो तेव्हा त्यांनी आम्हाला चुकीचे का ठरवावे? असा संतप्त सवालही आदित्यनाथ यांनी यावेळी केला.
योगी आदित्यानाथ यांना निवडणूक आयोगाने 'बाबार की औलाद' या उत्तर प्रदेशच्या संभल येथे म्हटलेल्या वाक्यावर स्पष्टीकरण मागितले आहे. त्यानंतर त्यांना ७२ तासांसाठी प्रचारबंदीची शिक्षा सुनावण्यात आली.