गिरिडीह (झारखंड) - गिरीडीह जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात राहणारी चंपा कुमारी आधी एका खाणीच्या क्षेत्रात काम करायची. एके दिवशी तिला कैलास सत्यार्थी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्याने विचारले असता तिने घरच्या आर्थिक परिस्थितीबाबत सांगितले. यानंतर तिला बालमजुरीतून मुक्त करत शाळेत पाठवण्यात आले. इथूनच चंपाने बालहक्कासाठी काम करणे सुरू केले. तिच्या या कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने तिला डायना अवॉर्डने सन्मानित केले.
चंपा ही जमदाग गावात राहते. ती आधी माइका खाण क्षेत्रात काम करायची. तिला शिक्षणाची गोडी होती मात्र, घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण घेता येणे शक्य नव्हते. यानंतर कैलास सत्यार्थी फाऊंडेशनच्या मदतीने तिला शाळेत जाण्याची संधी मिळाली. यानंतर चंपाने आपल्यासारख्या इतर मुली-मुलांनीही शाळेत जावे, बालमजुरी, बालविवाहसारख्या गोष्टींविरुद्ध काम करावे यासाठी प्रयत्न सुरू केले. ती आसपासच्या परिसरात शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासह बालविवाह, बालमजुरी, बालशोषणाविरूद्ध आवाज उठवू लागली.
चंपाचे काम सुरू होते. मात्र, तिच्या या कार्याला तिच्या वडिलांकडून नकार होता. हे काम करून काही फायदा नाही, याने काही साध्य होणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. तर, आसपासच्या लोकांनीही तिच्या वडिलांना मुलीला हे सर्व करू देऊ नका, असे सांगत. मात्र, चंपाचे जनजागृतीचे कार्य सुरुच होते. अखेर तिच्या कार्याची ब्रिटिश सरकारने दखल घेत तिला डायना पुरस्काराने सन्मानित केले.
मुलांचे जीवन शक्य तितके आनंदी व्हावे यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करणार असे चंपा सांगते. सोबतच प्रत्येकानेच या कार्यास पाठिंबा देऊन बालहक्कासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन ती देते.