नवी दिल्ली – विमान अपघात घडलेल्या कोझीकोड विमानतळाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गतवर्षीच या विमानतळाच्या संचालकांना विविध गंभीर सुरक्षा त्रुटी असल्याने डीजीसीएने कारणे दाखवा नोटीस बजाविली होती.
विमान वाहतूक नियामक संस्था असलेल्या डीजीसीएने कोझीकोड विमानतळावरील धावपट्टीला तडे गेल्याचा नोटीसमध्ये म्हटले होते. तसेच धापट्टीवर अतिरिक्त रबर जमा झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद केले होते.
गतवर्षी 2 जुलैला कोझीकोड विमानतळावर सौदी अरेबियामधून आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे शेवटचे टोक (शेपूट) हे जमिनीला धडकले होते. अपघात झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) कोझीकोड विमानतळाची 4 जुलै व 5 जुलैला पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सुरक्षेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या, असे डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. तर गतवर्षी 11 जुलैला कोझीकोड विमानतळाचे संचालक के. श्रीनिवास राव यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर राव यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.
शुक्रवारी रात्री दुबईहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसचा धावपट्टीवर अपघात झाला. विमान जमिनीवर उतरताना ते शेजारी असलेल्या भिंतीवर आदळून 35 फूट खोल खड्ड्यात पडले. या अपघात विमानाचे दोन तुकडे झाले. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या विमान अपघाताची चौकशी ही विमान अपघात तपास संस्था (एएआयबी), डीजीसीए आणि विमान सुरक्षा विभागाकडून करण्यात येणार आहे. या संस्थांचे अधिकारी तपास करण्यासाठी अपघातस्थळी पोहोचल्याची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसने आज सकाळी दिली.